मुंबई. देशभरात कोरोनाचा विळखा वाढत आहे. यातच दिल्लीतील निझामुद्दीन येथील 'तबलिकी-ए-जमात'चा धार्मिक कार्यक्रम ‘कोरोना’च्या संकटकाळात डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. या याकार्यक्रमात महाराष्ट्रातील 342 लोक सहभागी झाल्याचे समजते आहे.
औरंगाबादमधून 47 भाविक
या कार्यक्रमासाठी औरंगाबादमधून 47 भाविक सहभागी झाले होते. आतापर्यंत यातील 40 जणांची तपासणी केली गेली असून त्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर सात जणांना क्रांती चौक पोलिसांनी घाटी रुग्णालयात भरती केले. तर अन्य दोघांचा शोध सुरु आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सातपैकी सहा जणांनी एका लग्नाला हजेरी लावली होती.
यवतमाळमध्ये 12 संशयित
यवतमाळ जिल्ह्यातील 12 जण सहभागी झाले होते. तशी यादी प्रशासनाला प्राप्त झाली आहे. यापैकी यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्य असलेले 5 जण परत आले असून त्यांना क्वारंटाइनमध्ये दाखल करण्यात आले आहे. उर्वरित 7 जण अद्यापही जिल्ह्यात परत आले नाही. यापैकी काही जण परस्पर दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात गेल्याची किंवा दिल्लीतच थांबल्याची शक्यता आहे. तरीसुद्धा प्रशासनाकडून त्यांची माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
पुण्यातील 136 जण सहभागी
पुणे विभागातील तब्बल 182 जण 'तबलिकी-ए-जमात'ला सहभागी झाले होते. यातील 132 जण पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील होते. 182 पैकी 106 जण मिळून आले असून उर्वरित लोकांचा शोध घेण्यात येत असल्याचे पुणे विभागीय आयुक्तांनी सांगितले. तर कोल्हापुरातून 21 भाविक सहभागी झाले होते. याशिवाय सोलापूर, नांदेड, ठाणे, सातारा, उस्मानाबाद अशा जिल्ह्यातील भाविक सहभागी झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान 'तब्लिग जमात' हे देशातील 'कोरोना'चे मोठे हॉटस्पॉट असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
अहमदनगरमध्ये पाच कोरोनाग्रास्तांपैकी दोन परदेशी रुग्ण हे 'तबलिग जमात'चे सहभागी आहेत. तर अन्य 3 पॉझिटिव रुग्ण हे सहभागींच्या संपर्कातून बाधित झाले आहेत.
'तबलिकी-ए-जमात'मध्ये महाराष्ट्रातून कुठून किती भाविक?
पुणे, पिंपरी चिंचवड – 136
औरंगाबाद– 47
अहमदनगर – 34 (29 परदेशी नागरिक)
कोल्हापूर – 21
नवी मुंबई – 17
सोलापूर – 16
नाशिक – 15
मुंब्रा (ठाणे)- 14
नांदेड – 13
यवतमाळ – 12
सातारा – 7
उस्मानाबाद – 6
सांगली – 3
चंद्रपूर – 1
एकूण – 342
कार्यक्रमात सहभागी झालेल्या 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
याआधीच, कार्यक्रमात सहभागी झालेल्या 9 जणांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला आहे. तेलंगणामधील सहा जणांचा, तर कर्नाटक, जम्मू-काश्मिर, तामिळनाडूतील प्रत्येकी एकाचा मृत्यू ‘कोरोना’मुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जम्मू काश्मीरमधील 65 वर्षीय नागरिकाचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाल्यानंतर याची पाळंमुळं समोर येऊ लागली.