राज्यात सोमवारी नवीन ४७ रुग्ण वाढले; एकूण रुग्ण २५०, बळींचा आकडा १० वर

मुंबई - महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाचे ४७ नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या २५० वर गेली आहे. मुंबईत ३८, पुणे ५, नागपुरात २ व नाशिक, कोल्हापूर येथील प्रत्येकी एक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडला आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या ३९ जणांना आतापर्यंत घरी पाठवण्यात आले आहे. सोमवारी आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या दहावर गेली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सध्या १७१ जणांवर उपचार सुरू आहेत. मुंबई येथील आणखी काही रुग्णांचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त होण्याचे बाकी आहेत.


मुख्यमंत्री सहाय्यता निधीत १२.५० कोटी जमा : गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत १२ कोटी ५० लाख रुपये जमा झाले आहेत. तसेच सीएसआर निधीतून तसेच देणगी स्वरुपात अनेक उद्योग व संस्थांची मदत सुरू आहे. इंडियन ह्युम पाइप, रायचंद ट्रस्ट, वालचंद ट्रस्ट, इंडियन ऑइल, आयसीआयसीआय, बादल मित्तल ग्रुप, फार्म इझी, सिप्ला फाउंडेशन, गोदरेज ग्रुप, जेएम फायनान्शियल, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, एशियन पेंट्स या संस्थानी मास्क, व्हेंटिलेटर, पीपीई किट्स, आरटी-पीसीआर मशीन, अशी सुमारे १० कोटींची विविध उपकरण व साहित्य दिले.


सोमवारी राज्यभरात विविध रुग्णालयांत एकूण ३२८ जण भरती


राज्यात सोमवारी एकूण ३२८ जण विविध रुग्णालयांत भरती झाले. राज्यातील विविध विलगीकरण कक्षांत सोमवारपर्यंत ४,५३८ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ३,८७६ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. एकूण २२० जण पॉझिटिव्ह आले आहेत.


> सध्या राज्यात १९ हजार १६१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १२२४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये.


> आतापर्यंत ३९ कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडले आहे. यात मुंबई १४, पुणे ७, पिंपरी चिंचवड ९, यवतमाळ ३, अहमदनगर १, नागपूर ४, औरंगाबादमधील एकाचा समावेश आहे.


मुंबईतील वरळी कोळीवाडा सील


मुंबईत कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. वरळी कोळीवाडा येथे ५ हून अधिक कोरोना संशयित रुग्ण आढळल्याने हा संपूर्ण परिसर सील करून युद्धपातळीवर तेथे निर्जंतुकीकरण केले जात आहे. कोळीवाड्यात जाण्यास संपूर्ण बंदी घालण्यात आली असून कोणालाही बाहेरही येऊ दिले जात नाही. रविवारी वरळी कोळीवाड्यात संशयित कोरोनाग्रस्त सापडल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत परिसर सील करण्यास सुरुवात केली होती. सोमवारी आणखी कोरोनाग्रस्त सापडल्याने आता संपूर्ण परिसर सील केला आहे.


मुंबईत सॅनिटायझर, मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांना अटक


धारावीतील ३ गोडाऊनमधून २७ लाख २५,५०० रुपयांचा मास्कचा साठा जप्त करून ५ जणांना अटक केली आहे. बैंगणवाडी, गोवंडीतून चौघांना अटक करत त्यांच्याकडून ७५ लाखांचा मास्कचा साठा जप्त केला. गोरेगाव येथून एका मेडिकल स्टोअर्सवर धाड घालून २ लाख २२,९०० रुपयांचा साठा जप्त केला. चारकोप भागातील घरात १० लाखांचा हँड सॅनिटायझरचा साठा जप्त केला आहे.


जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याबाबत २४X७ मदत कार्य


कोरोना आजारासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना रेशन दुकानावर साहित्य न मिळणे, बाजारात वाढीव दराने वस्तूंची विक्री होणे तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत राज्यभरातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयामार्फत तात्काळ निरसन केले जात आहे.


पुण्यात कोरोना व्हायरसचा पहिला बळी, मुंबईतही एक रुग्णाचा मृत्यू


> पुण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. ५२ वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा पुण्यातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांनी कोणताही परदेश दौरा केलेला नव्हता. तसेच परदेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात ते आले नव्हते.


> मुंबईत शनिवारी ७८ वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल सोमवारी मिळाला आहे. तसेच त्यांना उच्च रक्तदाब आणि हृदयरोग हे आजारही होते.


राज्यतील कोरोनाग्रस्तांची संख्या


मुंबई ११२, पुणे ( शहर-ग्रामीण) ४४, सांगली २५, मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा ३२, नागपूर १६, यवतमाळ ४, नगर ५, सातारा, कोल्हापूर प्रत्येकी २, औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, बुलडाणा, नाशिक प्रत्येकी १, इतर राज्य – गुजरात १.