मुंबई . लॉकडाऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी अडचण ठरण्याची शक्यता आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले उद्धव हे सध्या दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत. घटनेच्या कलम १६४ (४) नुसार त्यांना पदावर राहण्यासाठी मुख्यमंत्री झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत िवधानसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य होणे आवश्यक आहे. ठाकरे यांनी २८ नोव्हेंबरला शपथ घेतली होती. त्यानुसार त्यांना २८ मेपर्यंत आमदार होणे आवश्यक आहे. मात्र कोरोनामुळे राजकीय हालचाली थंडावल्या आहेत. मार्चमधील प्रस्तावित ग्रामपंचायत निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.
येत्या २४ एप्रिलला विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होत आहेत. त्या दृष्टीने ठाकरे यांनी विधान परिषद सदस्य बनण्याची तयारी केली होती. मात्र निवडणूक आयोगाने अद्याप याची तारीख जाहीर केलेली नाही. आयोगाने याआधी राज्यसभेच्या निवडणुकाही स्थगित केल्या आहेत. याचीही तारीख नंतर घोषित होणार आहे. यामुळे अडचणीत भर पडली.
राज्याचे मुख्य सचिव अनंत कळसे यांनी सांगितले की, मेपर्यंत निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत तर ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळाला राजीनामा देऊन पुन्हा शपथ घ्यावी लागेल.