मुंबई. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घराबाहेर दिवे लावण्याचे आवाहन केले. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘देशाला मूर्खात काढू नका,’ या शब्दांत संताप व्यक्त केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही भाजपला प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करण्याचा रोग लागल्याची टीका केली. भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनीही पलटवार करत ‘त्यांना दिव्याचे महत्त्व कळले नाही,’ असे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ‘भारताने कोरोनावर लस शोधली, कुणालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत. कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही, असे भाषण अपेक्षित होते. त्यांनी या संकटाचाही इव्हेंट करायचे ठरवले. म्हणे... अंधार करा व बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मूर्खात काढू नका,’ अशा शब्दांत आव्हाडांनी संताप व्यक्त केला आहे.
सामूहिक शक्तीच्या दर्शनासाठी आवाहन : राम कदम
भाजपचे आमदार राम कदम म्हणाले, ‘तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या दिव्याचं महत्त्व राज्यातील नेत्यांना कळलेलं नाही, हे दुर्दैव आहे. देश एका संकटातून जातोय. या परिस्थितीत संपूर्ण देश एक आहे. या अंधकारातून मार्ग काढताना एक आशेचा किरण म्हणून प्रत्येकाने प्रकाशाचा दिवा हाती घेऊन एकतेचा संदेश द्यावा, असे पंतप्रधान मोदींना अपेक्षित आहे. दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या या दिव्याचे महत्त्व कळलेलं नाही.’
मोदींनी गंभीर व्हावे : थोरात देश गंभीर संकटाचा सामना करत आहे. अशा वेळी पंतप्रधान मोदींनी महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. दिवे लावा, टाळ्या वाजवा, असे आवाहन करण्याचे काम पंतप्रधानांचे नाही. त्यांनी आता तरी गंभीर व्हायला हवे. डॉक्टर, मेडिकल स्टाफ, पोलिस यंत्रणेसह सर्वजण जीव धोक्यात घालून काम करत आहेत. दिवे लावणे, टाळ्या वाजवणे असे इव्हेंट करणे नाही. भाजपला प्रत्येक गोष्टीत इव्हेंट करण्याचा रोग लागला आहे, असेही थोरात म्हणाले.